तीन कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात अटकेत असलेले भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी अखेर ठाणे महापालिकेतील गटनेतेपद सोडले आहे. पवार यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. याबाबत त्यांच्यावतीनेच माहिती देण्यात आली आहे.
गटनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर यापुढील काळात भाजपचा नगरसेवक आणि सामान्य कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहीन, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे. तीन कोटींच्या खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पवार फरार होते. दरम्यान, १० फेब्रुवारी रोजी ते पोलिसांपुढे शरण आले होते. त्याचवेळी कासारवडवली पोलिसांनी अटकेची कार्यवाही पूर्ण केली होती.
ठाणे महापालिका भाजप गटनेतेपदाचा राजीनामा देताना पवार यांनी आपल्यावरील सर्व आरोपही फेटाळले आहेत. ठाणे शहराचा नियोजनबद्ध विकास व महापालिकेतील विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत असताना माझ्याविरोधात २००८ मध्ये दाखल झालेल्या खंडणीच्या खोट्या तक्रारीचे प्रकरण उकरुन काढण्यात आले. माझ्या राजकीय कारकीर्दीत अडथळा आणण्यासाठीच हा प्रकार करण्यात आला. या आरोपामुळे मी व्यथित झालो असून, नैतिक मूल्य म्हणून महापालिकेतील गटनेतेपदाचा राजीनामा देत आहे, असे नारायण पवार यांनी नमूद केले आहे. यापुढील काळात भाजपचा नगरसेवक व सामान्य कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत राहीन, असे नमूद करतानाच भाजपच्या पक्षश्रेष्ठींबरोबरच माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या प्रत्येकाचा मी आजन्म ऋणी राहीन, असेही पवार यांनी पुढे म्हटले आहे. माझा न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे. माझ्या निर्दोषत्वाचे सर्व पुरावे मी न्यायालयाकडे देईन, असेही पवार यांनी पत्रात पुढे नमूद केले आहे.
नारायण पवार यांनी भाजप गटनेतेपद सोडले.